न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२०) :- एसईबीसी वर्गाकरिता आरक्षण न ठेवता सदर वर्गात अर्ज केलेल्या उमेदवारांचा अर्ज खुल्या प्रवर्गासाठी ग्राह्य धरण्यात येणार असून आयटीआयची स्थगिती मिळालेली प्रवेशप्रक्रियाही सुरू करण्यात येत आहे. आयटीआयच्या दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना प्रवर्गात, संस्थांच्या पसंतीक्रमात बदल करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी ३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जाहीर होईल. आयटीआय प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. ४ डिसेंबरपर्यंत दुसऱ्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे कळवण्यात येईल आणि ५ ते ८ डिसेंबरदरम्यान सायंकाळी ५ वाजेपर्यंत मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेशाची कार्यवाही करायची आहे. ५ ते ३ डिसेंबरदरम्यान प्रवेशाची तिसरी व चौथी फेरी पार पडणार असन विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची आणखी एक संधी संचालनालयाकडून देण्यात येईल.
राज्यात आयटीआयच्या एकूण उपलब्ध जागांपैकी एसईबीसी वर्गासाठी १३,८९० जागा उपलब्ध होत्या. पहिल्या फेरीदरम्यान या जगांसाठी १३०७९ अर्ज प्राप्त झाले होते, मात्र केवळ २०५४ जागांवर प्रवेशनिश्चिती होऊ शकली होती. आता उर्वरित ११८३६ जागा खुल्या प्रवर्गातून भरल्या जाणार असल्या तरी निश्चित प्रवेशही कायम राहणार असल्याची माहिती संचालनालयाने दिली.


















