न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२०) :- महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता डिसेंबर महिन्यात शिक्षक व पदवीधर आमदार निवडणुकीच्या मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात यावी व निवडणूक प्रचार सभांवरती निबंध घालण्यात यावेत, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
याबाबत संस्थेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या दिवाळी सणामुळे ‘ मिशन बिगीन अगेन’अंतर्गत शासनाने नागरिकांना नागरिकांना कोरोनामुळे महाराष्ट्रात लागू केलेल्या प्रतिबंधात्मक कायद्यातून सूट दिली. यामुळे नियमांचे उल्लंघन करत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि कोरोनाचा संसर्ग झाला.
अशा परिस्थितीत शिक्षक पदवीधर आमदार निवडणुकीमुळे व उमेदवारांच्या प्रचार सभांमुळे मोठ्या प्रमाणात शिक्षक पदवीधर मतदारांची गर्दी व सभा होत आहेत. या प्रचारसभांच्या गर्दीमुळे नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यातच नव्याने शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये बहुतांश शिक्षक कोरोना पोझिटिव्ह असल्याचे अहवाल आहेत. यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता डिसेंबर महिन्यात मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात यावी व शिक्षक पदवीधर आमदार निवडणूक प्रचार सभांवरती निर्बध घालण्यात यावेत.


















