न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२०) :- भोसरीतील इंद्रायणीनगर येथील औद्योगिक कारणांसाठी उभारलेल्या ४७ पत्राशेडमध्ये वीजचोरी होत असल्याचे महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने बुधवारी (दि. २५) उघड केले. याप्रकरणी संबंधितांवर भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली.
भोसरीमध्ये इंद्रायणी परिसरात पत्र्यांचे सुमारे ८० शेड उभारले आहेत. या शेडमध्ये औद्योगिक कारणांसाठी वीज वापर केला जात आहे. मात्र, त्यातील काही शेडमध्ये अनधिकृत वीजवापर सुरू असल्याची माहिती महावितरणला मिळाली होती. त्यानुसार महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने कारवाई केली. १९ पथके तयार करण्यात आली होती.
महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात एकूण ७५ अभियंते व कर्मचारी या कारवाईमध्ये सहभागी झाले होते. पोलीस बंदोबस्तात बुधवारी सकाळी ११ वाजता इंद्रायणीनगरमधील पत्र्यांच्या शेडमधील वीज जोडण्यांची तपासणी सुरू करण्यात आली. यात ४७ पत्र्यांच्या शेडमध्ये थेट वीजचोरी होत असल्याचे आढळून शाले. बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.