न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने कुष्ठ व क्षय रुग्ण शोध अभियाना १ ते १६ डिसेंबर या कालावधीत राबविले जाणार आहे. घरोघरी जाऊन पालिकेच्या वैद्यकीय विभागाचे कर्मचारी व स्वयंसेवक मंगळवारपासून सर्वेक्षण करणार आहे. त्यांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी शुक्रवारी (दि.२७) केले आहे.
कोरोना संसर्गामुळे कुष्ठरूग्ण व क्षय रुग्णांचे निदान व औषधोपचार करण्याचे प्रमाण यंदा कमी झाले आहे. या रुग्णांचे वेळीच निदान होऊन उपचार न मिळाल्यास त्याच्या सहवासातील इतर निरोगी लोकांना रोगाची लागण होण्याचा धोका असतो. त्यामुळे संसर्गाची साखळी वाढते. त्यासाठी राज्य शासनाने १ ते १६ डिसेंबर या १६ दिवसांच्या कालावधीत कुष्ठ व क्षयरुग्ण शोध अभियान राबविण्याच्या सूचना सर्व महापालिका व नगरपालिकांना दिल्या आहेत.
त्यानुसार पिंपरी – चिंचवड महापालिका कार्यवाही करीत आहे. डॉ. साळवे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, कुष्ठरोग अधिकारी डॉ. साबळे यांच्या समितीमार्फत ही मोहिम राबविली जाणार आहे. या समितीने सर्व वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आशा कार्यकर्ती व स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले आहे.