- रिक्षा मालक, टेम्पो, बस, ट्रक मालक यांच्यासाठी पिंपरीत मोफत कायदेशीर मार्गदर्शन केंद्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२०) :- रिक्षा चालक, टेम्पो, बस, ट्रक, कॅब मालकांसह सर्व वाहतूकदारांचे प्रश्न कोरोनामुळे बिकट झाले आहेत. कोरोनामुळे गेली आठ ते दहा महिना हा व्यवसाय पूर्ण पणे ठप्प झालेला आहे. यामुळे कर्जाचा डोंगर वाढला असुन, अनेकांचे बँक आणि फायनान्सचे हप्ते थकले आहेत. वाहतूकदारांच्या या परिस्थितीचा अनेक फायनान्स कंपन्या फायदा घेत असून, व्याजावर व्याज चक्रीवाढ व्याज लावत आहेत आणि गुंडामार्फत वसुलीसाठी धमकावले जात आहे. हप्ते भरण्यासाठी दादागिरी व दहशत केली जात आहे. यामुळे दहशतीच्या वातावरणात या घटकांचे जगणे मुश्किल झाले आहे.
फायनान्सच्या जाचाला कंटाळून अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. तरी हे सरकार या प्रश्नावरती गप्प आहे. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये महत्त्वाचे योगदान देणारे, सर्व प्रकारचे वाहतूकदार यांना मदत करण्यास सरकार तयार नाही. केंद्र सरकारने कोविड १९ साठी वीस हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले. परंतु, रिक्षा, टेम्पो, बस, ट्रक व कॅबमालक-चालक यांना मात्र कोणताही लाभ झाला नाही.
स्वबळावर सन्मानाने जीवन जगणारे हे घटक अडचणीमध्ये आहे. निराश आणि त्रास सहन करत जीवन जगत आहे. फायनान्स कंपन्यांचा अन्याय त्रास सहन न करता रिक्षा, टेम्पो ,ट्रक, बस कॅब आणि सर्व प्रकारच्या वाहनधारकांनी एकत्र येऊन फायनान्स कंपन्या आणि सरकारच्या विरोधात संघर्ष करावा, असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि वाहतूक पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि महाराष्ट्र वाहतूक पंचायतच्या वतीने रिक्षा, टेम्पो, कॅब, ट्रक, बस चालकांची पिंपरीत बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बाळासाहेब ढवळे, लक्ष्मण शेलार, विजय ढगारे, शाफिक शेख, धनंजय कुदळे, संजय दैडकर, दिपक कुसाळकर, संजय गजरे, रोहिदास कसाब, गौतम कांबळे, विलास जोगदंड, लखन जगधने, भरत पाचंगे, अजय साळवे, सचिन जाधव, मोहन सावंत, विलास पोपळे, गणेश सावंत, धनंजय कुदळे, हसनभाई तांबोळी, गणेश शिंदे आदी उपस्थित होते.
पंचायतिच्या वतीने रिक्षा, टेम्पो, कॅब, बस, ट्रक चालक-मालक यांच्यासाठी मोफत कायदेशीर मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले असुन, पिंपरी येथील भक्ती कॉम्प्लेक्स ऑफिस नंबर १२ पहिला मजला खराळवाडी पिंपरी येथे सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत पंचायत सल्लागार अॅड दिलीप शिंगोटे हे उपलब्ध असणार आहेत. ज्यांना फायनान्स कंपन्यांचा त्रास होत आहे त्यांनी योग्य ते कागदपत्र घेऊन वरील ठिकाणी येऊन भेटावे वरिल ठिकाणी मोफत मार्गदर्शक केले जाईल मोफत कायदेशीर मार्गदर्शन केंद्राचा लाभ रिक्षा टेम्पो बस ट्रक कॅब चालक मालकांनी घ्यावा असे आवाहन देखील बाबा कांबळे यांनी केले आहे.