- विविध बांधकाम व गृहनिर्माण संस्थांना होणार लाभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक, विविध बांधकाम संस्था, खाजगी व शासकिय कामाचे ठेकेदार, कारखानदार यांच्यासाठी पालिकेने पिण्या व्यतिरिक्त पाणी उपलब्ध करून दिले आहे. ज्या संस्थाना पाणी आवश्यक असल्यास त्यानुसार मनपाकडून रितसर कनेक्शन संबंधीत क्षेत्रिय कार्यालयातून मंजूर करून देण्यात येईल. पालिकेने याबाबत प्रसिद्धीस निवेदन दिले आहे.
त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने शासन निर्णय क्र. संकिर्ण २०१६ / प्र.क्र .२५९ / नवि.३३ दिनांक ३० नोव्हेंबर २०१७, सदरनुसार राज्यातील नागरी भागात तयार होणा-या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे व पुर्नचक्रीकरण व पुर्नवापर करणे हे संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्राथमिक कर्तव्य असल्याने सदर अधीनियमानुसार पिण्याव्यतिरीक्त पाण्याचे दर मा. महानगरपालिका ठराव क्र. ३३८ दि. २०/१२/२०१८ अन्वये मंजूर केलेले आहे.
त्यानुसार या पाण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे प्रचलीत दरापेक्षा घरगूती वापरासाठी २० % कमी व औद्योगिक वापरासाठी ३०% कमी असे दर निश्चित केले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत चिखली मैलाशुध्दीकरण केंद्रालगत स्पाईन रोडवर टैंकर भरणे करीता Stand post उभे केले आहेत. तसेच स्पाईन रोडवर मोशीपर्यंत पाईपलाईन केलेली आहे. यामधून पिण्याव्यतिरीक्त वापरासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते. इच्छूकांनी क्षेत्रिय कार्यालय येथे मनपाने निश्चित केलेल्या दरानुसार पैसे भरून सदर Stand post वरून पाण्याचे टैंकर भरून नेता येईल.
तसेच चिखली मैलाशुध्दीकरण केंद्र ते राजमाता जिजाऊ चौक मोशी ते धर्मवीर संभाजी चौक मोशी ते मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती / नाशिक पुणे महामार्गापर्यंत पाणी पिण्याव्यतिरीक्त वापरासाठी जलवाहीनी टाकण्यात आलेली आहे. सदर जलवाहिनी लगत छोट्या / मोठ्या गृहनिर्माण संस्थांना सदरचे पिण्याव्यतिरिक्त पाणी आवश्यक असल्यास त्यानुसार मनपाकडून रितसर कनेक्शन संबंधीत क्षेत्रिय कार्यालयातून मंजूर करून देण्यात येईल, असे या निवेदनात म्हटले आहे.














