- पात्र झोपडीधारकास फोटोपास द्या, घरे उपलब्ध करा; आंदोलकांच्या मागण्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसेंबर २०२०) :- कासारवाडी येथील हिराबाई लांडगे झोपडपट्टीमधील सर्वेक्षणानंतर केवळ १३१ झोपडपट्ट्यांना पात्र करण्यात आले आहे. उर्वरित ११६ झोपडपट्टीधारकांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी झोपडीधारकांनी पालिका भवनासमोर नुकतेच धरणे आंदोलन केले.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. पालिकेच्या झोपडपट्टी क पुनर्वसन विभागाकडून झोपडपट्टी सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेत २४७ झोपडपट्टीची नोंद करण्यात आली. लांडगे झोपडपट्टीची देखील नोंद करण्यात आली होती. सन १९७० मध्ये ती झोपडपट्टी अधिकृत घोषित करण्यात आली. मात्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे (एसआरए) अंतिम पात्रता यादीत केवळ १३१ झोपडीधारकांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे उर्वरित ११६ झोपडीधारकांचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
झोपडीधारकांमध्ये संभ्रमाचे, भीतीचे वातावरण आहे. हक्काचे छप्पर कोण देणार? रेल्वेपासून संरक्षण कोण करणार असा प्रश्न या झोपडीधारकांना पडला आहे. पात्र झोपडीधारकास फोटोपास देणे. या झोपडपट्टीतील नागरिकांसाठी शिबिर घेऊन कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना पात्र करावे. या झोपडीधारकांना भोसरी, कासारवाडी येथे पालिकेच्या सांस्कृतिक भवनासाठी ५ गुंठे आरक्षण आहे. त्याच जागेवर या ११६ झोपडपट्टीतील लोकांना घरे विकसित करून द्यावीत, अशी मागणी झोपडीधारकांनी केली आहे.


















