न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. १२ डिसें.) :- ‘डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध दिल्याने एक मुलगी आजारी पडली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिचा सर्व खर्च तुम्हाला करावा लागेल आणि नाही केला तर पोलीसांत तक्रार देईन’, अशी नवी मुंबईतील पुजारी नामक इसमाने दूरध्वनीवरून औषध विक्रेते किरण रमेश निकम (वय ३२, रा. तुळजाभवानी कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) यांना धमकी दिली आहे. याप्रकरणी किरण निकम यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणाचा केमिस्ट असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्टचे उपाध्यक्ष व काळेवाडी-रहाटणी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विवेक मल्हारी तापकीर यांनी निषेध केला आहे. असोसिएशन च्या वतीने लवकरच या प्रकरणाचा अन्न व प्रशासन विभागाकडे तसेच पोलीस प्रशासनाकडे छडा लावण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सागितले आहे. यापूर्वीही अज्ञातांनी अनेक औषध विक्रेत्यांना निनावी दूरध्वनीद्वारे संपर्क केला असून, त्यांना बनावट औषध विक्रीप्रकरणी प्रशासनाकडे तक्रार करण्याची धमकी दिलेली आहे. औषध विक्रेतेही अशा फसव्या धमकीला घाबरून, या लुटारूंना भिक घालत आहेत. औषध विक्रेत्यांना अशा प्रकारे गंडा घालणाऱ्या अनेक तक्रारी असोसिएशनकडे आलेल्या आहेत.
औषध विक्रेत्यांनीही अशा फसव्या धमक्यांना न घाबरता, पोलिसात तक्रार द्यावी किंवा अन्न व औषध प्रशासनाकडे संबंधितांविरोधात तक्रार करावी. न जमल्यास संघटनेकडे रीतसर तक्रार दाखल करण्याचे आवाहन, काळेवाडी-रहाटणी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष व केमिस्ट असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्टचे उपाध्यक्ष विवेक मल्हारी तापकीर यांनी केले आहे.












