- पश्चिम सांगवी जेष्ठ नागरिक संघाचा ५ वा वर्धापन दिन उत्साहात
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सांगवी (दि. १३ डिसें.) :- संघर्षमय जीवनातून पुढे आल्यानंतर जेष्ठ नागरिक न होता, उर्मीने काम करा. समाजातील बेताल गोष्टींना जेष्ठ नागरिकच वैचारिकतेतून आवर घालू शकतात, असे मत नाट्य परिषेदेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केले.
जुनी सांगवीतील पश्चिम सांगवी जेष्ठ नागरिक संघाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भोईर बोलत होते. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरीक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर कोळी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, संघाचे अध्यक्ष ईश्वरलाल चौधरी, अशोक चव्हाण, प्रकाश देशमुख, सुदामराव बोंबले, बबनराव शितोळे, संभाजी मनोकर, रमेश राणे, शैला लोंढे, जनार्दन सावंत, उमेश पाठक, गोपीनाथ लोंढे, निर्मला वाघमारे, महेश भागवत, मीना शितोळे, भटू शिंदे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी संघाच्या अहवालाचे प्रकाशन माजी आमदार विलास लांडे आणि भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. याबरोबरच वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमही घेण्यात आले. कृष्णाई महिला भजनी मंडळाने भजनांचा कार्यक्रम सादर केला. तसेच लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान विषयावर मूकनाट्य सादर करीत स्वच्छतेविषयी जनजागृती केली. ज्येष्ठ नागरीक महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक स्पर्धांही यावेळी घेण्यात आल्या.
भोईर पुढे म्हणाले, कुठे भ्रष्टाचार होत असेल, ज्येष्ठांनी सडेतोड भूमिका घ्यावी. तरुणांवर रागावण्याचा त्यांना अधिकार आहे. नानासाहेब शितोळे यांच्यामध्ये इतका वैचारिक दृष्टीकोन होता, की जे चुकीचे चालले आहे, त्यावर ते सडेतोड भूमिका घेत. मनातील उर्मी, शक्ती, दिनचर्येची सुरुवात कशी करता, संगत, संतती, संपत्ती, आरोग्य, ईश्वर या पाच गोष्टी भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. सकारात्मक विचार घेऊन तुम्ही बाहेर कसे पडता, यावर वयाचे मूल्यमापन होत असते. सर्व संघर्षमय जीवनातून गेल्यानंतर एक प्रगल्भता येते. संघर्षातून तावूनसुलाखून या टप्प्यापर्यंत पोहोचतो. पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने झालेल्या विकासात ज्येष्ठ नागरीकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. आज मोबाईलमुळे घरातील संवाद हरवला आहे. आजी आजोबांच्या गोष्टीऐवजी मोबाईलची गेम सुरु झाली आहे. त्यामुळे मोबाईल मुलांपासून दूर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
विलास लांडे यांनी सांगितले, की समाजात आज ज्येष्ठांना योग्य वागणूक दिली जात नाही. ज्येष्ठांचे मन दुखावले जाते. त्यामुळे घरातील संवाद हरवत चालला आहे. ज्येष्ठ नागरीकांना ज्येष्ठ म्हणून नाही, तर तरुणांप्रमाणे वागणूक दिली जावी. भविष्यात आम्हीही ज्येष्ठ होणार आहोत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती तोडकर यांनी, तर आभार अशोक चव्हाण यांनी मानले.












