- आज तब्बल ४५६ कोरोना योद्ध्यांनी घेतली लस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२१) :- केंद्र व राज्य शासनाच्या सुचनानुसार कोविड -१९ वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवार दि. १६ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा तर्फ माई ढोरे यांचे अध्यक्षतेखाली नवीन जिजामाता रुग्णालयात लसीकरणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ महानगरपालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ.पवन साळवे यांना लस टोचून करण्यात आला.
या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, उपमहापौर केशव घोळवे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेवक संदिप वाघेरे, शैलेश मोरे, प्रेमकुमार उर्फ बाबू नायर, नगरसेविका उषा वाघेरे, निर्मला कुटे, सविता खुळे, निकिता कदम, अर्चना बारणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, महिला वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. संगिता तिरुमणी, डॉ. बाळासाहेब होडगर, आदी मान्यवर व रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या यमुनानगर रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, वाय.सी.एम.रुग्णालय, पिंपळे निलख दवाखाना, कासारवाडी दवाखाना, तालेरा रुग्णालय व ईएसआयएस या ०८ रुग्णालयांमध्ये कोविड -१९ लसीकरणास आजपासून सुरुवात झाली असून ही लस आरोग्य सेवा देणा-या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना प्राधान्याने देण्यात येणार आहे. दिवसभरामध्ये एका केंद्रावर १०० लाभार्थ्यांना लस देण्याचे आयोजिले आहे. तसेच चार आठवडयानंतर या लसीच्या दुसरा डोस लाभार्थ्याला दिला जाणार आहे
कोविड ऍपद्वारे लाभार्थीच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस द्वारे संदेश पाठविला जाणार असून सदर संदेशामध्ये लसीकरण दिनांक, वेळ व स्थळ याचा उल्लेख असेल. आज दिवसभराध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ०८ केंद्रावर ४५६ लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे लसीकरण करण्यात आलेले आहे.
यमुनानगर रुग्णालय ६०, नवीन जिजामाता रुग्णालय ७१, नवीन भोसरी रुग्णालय ६६, वाय.सी.एम.रुग्णालय ४९, पिंपळे निलख दवाखाना ४९, कासारवाडी दवाखाना ६५, तालेरा रुग्णालय ५०, ईएसआयएस रुग्णालय ४६ असे एकूण ४५६.
लस टोचल्यानंतर लस टोचणारे अधिकारी लाभार्थ्यांना लसीबाबत माहिती देतात. लस टोचल्यानंतर त्रास झाल्यास करावयाच्या उपाययोजना, लसीच्या चार आठड्यानंतर येणा-या दुस-या डोसची तारीख, तसेच लस टोचल्यानंतर आर्धा तास निरिक्षण कक्षामध्ये निरिक्षणाखाली थांबण्यासाठी सुचित करण्यात येते. लसीकरण झाल्यानंतर देखील लाभार्थ्यांनी सामाजिक अंतर, मास्क (मुखपट्टी), सॅनिटायझर किंवा साबणाब्दारे वारंवार हाताची स्वच्छता करणे गरजेचे आहे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वैद्यकिय विभागाकडून करण्यात येत आहे.