- शहरवासियांच्या पाणी प्रश्नावर सत्ताधारी भाजप गंभीर नाही – राहुल कलाटे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२१) :- शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असून, पाणी टंचाईबाबत अनेक भागांत तक्रारी आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण गरजेचे आहे. अशी परिस्थिती असताना पाणीपुरवठा योजनेवरील २१ कोटींचा निधी वैद्यकीय विमा योजनेसाठी भाजपने वळविला आहे. त्यावरून भाजप शहरवासियांच्या पाण्यासंदर्भात गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे, असा आरोप शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी पत्रकार परिषदेत केला.
शहराला अतिरिक्त पाणी मिळावे म्हणून आंद्रा व भामा आसखेड धरण योजना पालिका राबवित आहे. त्या माध्यमातून शहराला अतिरिक्त पाणी मिळेल, असा दावा भाजप करीत आहे. दुसरीकडे त्याच कामासाठीचे २१ कोटींचा निधी विमा योजनेकडे वर्ग करीत आहे. ती शहरवासीयांची फसवणूक आहे.
कोट्यवधींची टक्केवारी मिळावी म्हणून कर्मचारी महासंघांचा विरोध डावलून विमा योजना लागू करण्याचा घाट घातल्याचा आरोप कलाटे यांनी केला. विमा योजना नको म्हणून कर्मचारी पालिका भवनाबाहेर उपोषणाला बसले आहेत. तरीही, भाजपचे एक आमदार व स्थायीचे माजी अध्यक्ष यांच्या दबावामुळे आयुक्त हर्डीकर यांनी योजना लागू केली आहे. धन्वंतरीपेक्षा विमा योजना अधिक खर्चीक आहे. त्यासंदर्भात महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्री व संबंधित नेत्यांना भेटून तक्रार करणार आहे, असे कलाटे यांनी स्पष्ट केले.
















