- वाढत्या प्रतिसादामुळे पुढील वर्षी राज्यभरात प्राथमिक फेऱ्या…
- १४ फेब्रुवारीला पारितोषिक वितरण समारंभ; भाऊसाहेब भोईर यांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२१) :- अ. भा. मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान, कोहिनूर ग्रुप पुरस्कृत ‘श्रीमती चंदकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान’ आयोजित कै. राम गणेश गडकरी करंडक राज्य स्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा यंदा ११ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे होणार आहेत.
परिषदेच्या या शाखेचे हे २५ वे म्हणजे ‘रौप्य महोत्सवी वर्ष’ आहे. सातत्यानं २१ वर्षे ही स्पर्धा होत असून, स्पर्धेचे हे २२ वे वर्ष आहे. कोविडच्या जवळजवळ १० महिन्यांमधे कलाकारांच्या कलेला वाव न मिळाल्याने, यंदा कलाकार संघांनी अत्यंत विक्रमी संख्येत आपल्या प्रवेशिका पाठविल्या. ही स्पर्धा जाहीर झाल्यापासून पहिल्या दहा दिवसांतच निर्धारीत बावीस प्रवेशिका संपल्या. त्यानंतर बाहेरगांवच्या संघांनी आग्रह केल्यामुळे सुरवातीस १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान नियोजिलेली ही स्पर्धा ११ तारखेसाठी वाढविण्यात आली.
यंदा स्पर्धेत एकूण ३५ संघ सहभागी होत असून त्यात तब्बल २१ संघ बाहेरगांवचे आहेत. यात चंद्रपूर, अमरावती, ठाणे, नाशिक, नवी मुंबई, मुंबई ,सोलापूर , इचलकरंजी असे राज्यातील विविध भागातून स्पर्धक येणार आहेत. वर्षोगणिक स्पर्धक संघांमध्ये लोकप्रिय होत असलेली ही स्पर्धा आता शब्दश: राज्यस्तरीय झाल्याने व सुमारे १२ संघांना प्रवेश देता न आल्याने, पुढील वर्षीपासून राज्यभरात प्राथमिक फेरी घ्यावी, असा विचार केला गेला आहे. त्यानुसार पुढील वर्षांपासून प्राथमिक स्पर्धा राज्यभरात घेण्यात येतील व अंतिम स्पर्धा चिंचवड येथे होतील.
स्पर्धेचे उदघाटन नेहमीप्रमाणे पहिल्या दोन संघांच्या पडद्यामागील कलाकारांच्या हस्ते दीपप्रज्वल करुन गुरुवार, दि. ११ तारखेस सकाळी ९ वाजता होऊन स्पर्धेस सुरुवात होईल. या संपूर्ण स्पर्धेतील विविध विषयांवरील ३५ एकांकिकांचा अभ्यास करण्याची आणि त्यांचा आस्वाद घेण्याची संधी, पिंपरी चिंचवड मधील प्रेक्षकांना मिळणार असल्याने जास्तीत जास्त रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.
या स्पर्धा पाहण्यासाठी प्रतिदिन नाममात्र ५० रुपये प्रवेशमूल्य असेल. त्यामुळे केवळ ५० रुपयांमधे साधारण ९ ते १० एकांकिका बघता येऊ शकतील.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे रविवारी दि. १४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वांजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. कोहिनूर ग्रुपचे प्रायोजकत्व असलेल्या या स्पर्धेचे संयोजन सर्वश्री सुहास जोशी, किरण येवलेकर, नरेंद्र आमले, राजेंद्र बंग, जयराज काळे, नितीन शिंदे, संतोष शिंदे, महेश लाकाळ तसेच गौरी लोंढे करीत आहेत, अशी माहिती भोईर यांनी दिली.


















