- अटल बिहारी असते तर आत्तापर्यंत मुंबई आणि पुण्यात मेट्रो सुरू झाली असती
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. १८ डिसें.) :- मेट्रोमुळे पुण्याच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला जाईल आणि २०१९ अखेर पुण्यात १२ किलोमीटरपर्यत मेट्रो धावेल, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केले. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो ३ मार्गिकेचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंजवडी येथे पार पडला, यावेळी ते बोलत होते.
श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदिपसिंग पुरी, पालकमंत्री गिरीश बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे आदी उपस्थित होते.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली आणि शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे यांचं स्मरण केलं. आम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो असंही पंतप्रधान म्हणाले. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असते तर आत्तापर्यंत मुंबई आणि पुण्यात मेट्रो सुरू झाली असती असंही ते म्हणाले. महाराष्ट्रात पुण्यासह आठ शहरं स्मार्ट करणार, असंही आश्वासन मोदीं यांनी यावेळी दिले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘देशाला सुलभ वाहतूक व्यवस्था देण्याचं आमचं ध्येय आहे. पुण्यातील पायाभूत सुविधांचा भाजप सरकारकडून विकास होत आहे. मेट्रो आता शहरांची लाईफलाईन बनत आहे. मागील चार वर्षात देशात ५०० किमी मेट्रोचं जाळं निर्माण केलं आहे. तसेच आणखी ३०० किमीचे मेट्रो मार्ग तयार करणार असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले आहे.












