- कागदपत्राअभावी सोडावे लागतेय हक्काच्या घरावर पाणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. मार्च २०२१) :- महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पातील पात्र अर्जदारांचे सोमवार (दि. ८) पासून मूळ कागदपत्रे तपासणीस सुरूवात करण्यात आली आहे मात्र, अनेकांनी मूळ कागदपत्रे सोबत न आणल्याने त्यांना माघारी फिरावे लागले. कागदपत्रे तपासणीसाठी नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले आहे.
कागदपत्रांची तपासणी चिंचवडगावातील झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग कार्यालयात सुरू आहे. महापौर ढोरे यांच्यासह विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी त्या ठिकाणी भेट देऊन सूचना केल्या. सहायक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप, संभाजी घुले व कर्मचारी कागदपत्रांची तपासणी करीत आहेत. तपासणीच्या वेळी मूळ कागदपत्रे सादर करणे सक्तीचे आहे. अन्यथा अर्ज बाद केले जाणार आहे.
चऱ्होली, बो-हाडेवाडी व रावेत येथील गृहप्रकल्पातील सदनिकांसाठी पात्र अर्जदारांनी मूळ सर्व कागदपत्रे सादर करणे अत्यावश्यक आहे. त्यात सन २०१९-२० चा उत्पन्न दाखला किंवा एका वर्षाच्या इन्कम टॅक्स रिटर्न प्रमाणपत्र किंवा फॉर्म १६, आरक्षित वर्गातील अर्जदारांनी जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अर्जदारांसह कुटुंबांतील सर्व सदस्यांचे आधारकार्ड व पॅनकार्ड, अर्जदाराच्या बँक पासबुक व रद्द केलेला धनादेश, मतदार ओळखपत्र, भाडेकरार, चालू महिन्याचे वीज बिल, डोमीसाईल दाखला, अर्जदार दिव्यांग असल्यास तसे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
















