- चिंचवड, लांडेवाडी, काळेवाडी, सौदागर, दापोडी-फुगेवाडी, किवळेचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. मार्च २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड, लांडेवाडी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, दापोडी, फुगेवाडी आणि किवळे येथील मैलाशुद्धीकरण केंद्रातील पंप हाऊसची वार्षिक देखभाल दुरूस्ती करण्यात येणार आहे. या पाचही वेगवेगळ्या पंप हाऊसच्या कामासाठी तीन वर्ष कालावधीकरिता तब्बल १० कोटी ६० लाख रूपये ठेकेदारांना देण्यात येणार आहेत.
पिंपरी – चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. शहरात दररोज ४५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यापैकी सुमारे २९० दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होते. या सांडपाणी, मैलापाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात १४ मैलाशुद्धीकरण केंद्र बांधण्यात आले आहेत. मैलाशुद्धीकरण केंद्र आणि पंप हाऊसची वार्षिक देखभाल दुरूस्ती ठेकेदारांमार्फत करण्यात येते.
पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत चिंचवड मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत गोखले पार्क, काकडे पार्क, केशवनगर, देऊळमळा येथील पंप हाऊस, कासारवाडी टप्पा दोन अंतर्गत भोसरी – लांडेवाडी येथील पंप हाऊस, कासारवाडी टप्पा एक अंतर्गत काळेवाडी आणि पिंपळे सौदागर येथील मैलापाणी पंप हाऊस, कासारवाडी टप्पा तीन अंतर्गत दापोडी, फुगेवाडी येथील पंप हाऊस किवळे येथील मैला पंप हाऊसची वार्षिक देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. या पाचही ठिकाणच्या पंप हाऊसच्या कामांसाठी ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. या पाचही निविदा वेगवेगळ्या कामांसाठी आहेत. वेगवेगळ्या ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली आहे. लघुत्तम दर सादर केलेल्या ठेकेदारांसमवेत करारनामा करण्यात येणार आहे.
















