- बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. गोरखनाथ झोळ व कार्यकारणीचा सत्कार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. मार्च २०२१) :- थोर क्रांतीज्योती, समाजसुधारिका, आद्य शिक्षिका, प्रथम मुख्याध्यापिका, महान कवियत्री क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन चिंचवडच्या मोहननगर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संस्थेचे प्राथमिक विद्यालयात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. गोरखनाथ झोळ तसेच सर्व कार्यकारणी सभासदांचा सत्कार विद्यालय, संस्थेच्या वतीने करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अँड. गोरखनाथ झोळ, संस्थेचे संस्थापक/कार्यवाह अँड दिलीप निंबारकर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री निंबारकर व बार असोसिएशन सदस्यांच्या हस्ते सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे व सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड गोरखनाथ झोळ यांचे व त्यांच्या कार्यकारणीतील सदस्य अँड. अजित शिंगारे- उपाध्यक्ष, अँड. कृष्णा वाघमारे- सदस्य, ॲड मुकुंद ओव्हाळ- माजी सचिव व ॲड प्रवीण बोडके यांचे स्वागत व सत्कार केला तसेच सदर कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाचे उपशिक्षक गजानन शिंदे सर यांनी सावित्रीबाईंच्या जीवनचरित्राचा आढावा आपल्या भाषणात घेतला. त्याच प्रमाणे निंबारकर सर यांनी संस्था उभारणीचा व विद्यालयाची ध्येयधोरणे याचे विवेचन केले. तसेच काम करताना शिक्षण सुरू ठेवून उच्च गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निंबारकर मॅडम यांचे त्यांनी कौतुक केले. तसेच नवीन बार असोसिएशन लोकाभिमुख कार्य करेल या विषयी आशावाद व्यक्त केला. न्यायालय लवकरच नवीन जागेत स्थलांतर कराल असा विश्वास व्यक्त केला.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री निंबारकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर, जगदाळे यांनी आभार मानले. गणेश बबन वाळुंज यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वंदे मातरम्ने कार्यक्रमाची समाप्ती झाली.