- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्हाधिका-यांचा फतवा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. मार्च २०२१) :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यात वाढतो आहे. त्यामुळे ३० मार्च रोजी देहुगाव येथे साजरा होणाऱ्या तुकाराम महाराज बीजसोहळ्यास केवळ ५० वारकरी – भाविकांना उपस्थित राहण्याची परवानगी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.
तत्पूर्वी श्रीक्षेत्र देहूगाव येथे वैकुंठगमन मंदिराच्या परिसरात मंगळवारी सकाळी ११ वाजता श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या कार्यालयात हवेली प्रांताधिकारी सचिन बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी पिंपरी- चिंचवडच्या अप्पर तहसीलदार गीता गायकवाड, देहूगाव नगरपंचायतीचे प्रशासक मधुसूदन बर्गे, मंडलाधिकारी शेखर शिंदे, तलाठी, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे, डॉ. किशोर यादव, पोलीस पाटील सुभाष चव्हाण, चंद्रसेन टिळेकर आदी उपस्थित होते.
बैठकीत डॉ. किशोर यादव यांनी सांगितले, सध्या देहूगावमध्ये सहा सूक्ष्मप्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाचे ३२ रुग्ण असून १७ जण गृहविलगीकरणात आहेत. संत बीजसोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो यात्रेकरू दर्शन घेण्यासाठी देहूत येतील. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे बीजसोहळा रद्द करण्यावर उपस्थितांचे एकमत झाले.
या बैठकीनंतर देहु नगरपंचायतीचे प्रशासक मधुसूदन यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना तुकाराम बीज यात्रा रद्द करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी ५० वारकरी – भाविकांच्या उपस्थितीत बीजसोहळा साजरा करण्याची परवानगी दिली. सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या भाविकांची यादी पोलीस विभागाकडे सादर करून त्यांचे पासेस करून घ्यावेत, त्यांची कोरोना चाचणीही करून घ्यावी, परराज्यातून व जिल्ह्यातून येणाऱ्या भाविक, दिंडीचालक – मालक व फडकरी यांना कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देहूत येऊ नये, यासाठी संस्थानच्या वतीने आवाहन करावे. सोहळा भाविकांना घरी बसून पाहता यावा व दर्शन घेता यावे याकरिता ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करावी. पोलिसांनी सदर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश पारीत करावेत, आदी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.