- कार्यालय बंद; नागरिक, वकीलांची गैरसोय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२१) :- भोसरी -लांडेवाडी येथील सह – दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्रमांक १४ येथील प्रमुख अधिकाऱ्याच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सोमवारी (दि. २२) सकाळी ११:३० च्या सुमारास सह – दुय्यम निबंधक कार्यालय बंद करण्यात आले.
पर्यायाने, दस्त नोंदणीसाठी आलेले नागरिक आणि वकील यांचा हिरमोड झाला. कार्यालयामध्ये आवश्यक औषध फवारणी करून त्यानंतर कार्यालय सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
हवेली क्रमांक १४ यासह – दुय्यम निबंधक कार्यालयात दररोज सरासरी ६० दस्तांची नोंदणी होते. कार्यालयामध्ये दस्त नोंदणीसाठी दररोज नागरिक, वकील असे २५० ते ३०० जण उपस्थित असतात. कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असतानाही सोशल डिस्टंसिंगकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी आवश्यक ‘ थर्मल गन’ची सोय केलेली नसल्याचे वकिलांनी सांगितले.
















