- निगडी पोलिसांची मोठी कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२१) :- रागाने बोलल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने एकाच्या पोटात धारधार शस्त्र खुपसून खून केल्याची घटना पीसीएमसी कॉलनी येथे घडली होती. त्यानंतर मयताच्या मित्रांनी समोरच्या गटातील एकावर जीवघेणा हल्ला चढविला. या दोन्ही घटनेतील अकरा आरोपींना निगडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
पीसीएमसी कॉलनी ओटा स्कीम येथील समाज मंदिर गार्डन परिसरात १९ एप्रिल रोजी दिलीप लोंढे आणि त्याचा मावस भाऊ आकाश उर्फ मोन्या कांबळे गप्पा मारत होते. त्यावेळी हेमंत खंडागळे आणि त्याच्या अल्पवयीन मित्रांसमवेत समाज मंदिराकडे चालला होता. त्यावेळी आकाश कांबळे याने एका अल्पवयीन मुलाला रागाने काय रे कोठे चाललास असे म्हटले. त्याचा राग आल्याने रात्री पावणे नऊच्या सुमारास दिलीप लोंढे, आकाश कांबळे आणि त्यांचे मित्र बोलत उभे असताना हेमंत खंडागळे, यश उर्फ गोंदया खंडागळे, वैभव वावरे आणि तीन अल्पवयीन मुले तेथे आली. त्यातील एका अल्पवयीन मुलाने चॉपरसारखे धारधार हत्यार आकाश कांबळेच्या पोटात खुपसले. उपचारा दरम्यान कांबळे मृत्यू झाला. कांबळे याच्या साथीदारांनी २० एप्रिल रोजी दुस-या गटातील शक्तिमान कांबळे, रुपेश खवळे यांना गाठले. खवळे पळून गेला. शक्तिमान कांबळे पळून जात असताना तथागत सोसायटीसमोर पडला. त्याला काठ्यांनी मारहाण करण्यात आली. आरोपी गुढय्या याने सीमेंट ब्लॉक डोक्यात घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
अविनाश राहुल धोंगडे (वय २३, रा. पीसीएमसी कॉलनी ओटा स्कीम, निगडी), निखिल रामदास साळवे (वय २७, रा. पठाण हौसिंग सोसायटी, रुपीनगर), संतोष गणेश वाल्मिकी (वय २० रा.पीसीएमसी कॉलनी), प्रसाद नंदकुमार बहुल (वय २५, अण्णाभाऊ साठे वसाहत, निगडी), दुर्वेश दत्ता भिंगारे वय १९ रा. पीसीएमसी कॉलनी, साहिल गुलाब शेख, योगेश उर्फ किडक्या राजभोग, गुढघ्या सन्या. दीपक विजय घडसिंग, प्रवीण लक्ष्मण काढाळकर यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुनाच्या गुन्ह्यातील सहा पैकी तीन अल्पवयीन आरोपी आहेत. उर्वरित तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तर, खुनाच्या प्रयत्नातील योगेश राजभोग आणि गुढघ्या सन्या वगळता इतर आठ जणांना पोलिसांनी अटक केली. लागोपाठ घडलेल्या दोन घटनांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण होते. या गुन्हाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही गुन्ह्यातील आरोपींच्या अटकेसाठी पाच टीम बनविण्यात आल्या होत्या.