- संचलनाची जबाबदारी आमची..
- पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटनेची जिल्हा प्रशासनाला साद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२१) :- करोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनची अधिक गरज भासू शकते. जिल्हा प्रशासनाने भोसरी एमआयडीसीत ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारावा. हा प्रकल्प पिंपरी – चिंचवड लघुउद्योग संघटना चालवेल. तिसऱ्या लाटेदरम्यान सर्व उत्पादित ऑक्सिजन वैद्यकीय क्षेत्राला पुरवू, अशी ग्वाही संघटनेने दिली आहे.
दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचे महत्व प्रशासन व नागरिकांना समजले. मात्र, नेमका याचा फटका एमआयडीसीमधील उद्योगाना बसला. दुसऱ्या लाटेदरम्यान उद्योगविश्वाच्या वाट्याचा ऑक्सिजन हा वैद्यकीय विभागाकडे वळविण्यात आला. रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी हे करणे गरजेचे असल्याने हे सर्व सोपस्कर करण्यात आले. मात्र, त्यामुळे उद्योगांच्या उत्पादन चक्राला ब्रेक लागला होता.
तिसरी लाट आल्यास, त्या काळात ऑक्सिजनच्या मागणीत वाढ होऊ शकते. त्यामुळे आताच नियोजन करणे आवश्यक आहे. हा प्रकल्प संघटना चालवेल. त्याची देखभाल दुरुस्ती देखील संघटनाच करेल तर, वैद्यकीय क्षेत्राला आवश्यक असलेल्यावेळी उत्पादन झालेला सर्व ऑक्सिजन वैद्यकीय विभागाला पुरविण्याची देखील संघटनेची तयारी आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिली.