- पिंपरीतील मगर स्टेडियम परिसरातील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जुलै. २०२१) :- बारा वर्षीय मुलाने झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे गुरुवारी (दि. १५) दुपारी उघडकीस आली. सुशांत तानाजी सरवदे (वय १२, रा. विठ्ठल नगर, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
ही घटना त्याच्या मित्राने घरी येऊन सुशांतच्या आईला सांगितली. सुशांत गुरुवारी सकाळी मित्रांसोबत खेळण्यासाठी पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडियम जवळ गेला होता. बेशुद्ध अवस्थेतील सुशांतला खाली उतरून तात्काळ वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
नुकताच तो सातवी उत्तीर्ण होऊन आठवीमध्ये गेला होता. लॉकडाऊनमुळे सुशांत आपल्या आई-वडिलांकडे पिंपरीत आला होता. त्याचा कोणीतरी घातपात केला आहे, अशी शक्यता सुशांतच्या आई- वडिलांनी व्यक्त केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.