- से. २३ ते डांगे चौक परिसरातील पाण्याच्या पाईपलाईनचे काम मार्गी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२१) :- पिंपरी-चिंचवड मनपाच्या सेक्टर क्रमांक २३ जलशुद्धीकरण केंद्रापासून ते डांगे चौकापर्यंतच्या साडेसात किलोमीटरच्या एक हजार मिलिमीटर व्यासाच्या पाण्याच्या लाईनचे काम वाल्हेकरवाडी येथील शेतकरी वाल्हेकर व इतरांनी मनपासोबत जमीन मोबदल्याकरिता अडवले होते.
अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या कामाची आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भूसंपादनाबाबत या शेतकऱ्यांशी चर्चा करून समस्येवर मार्ग काढला. तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे लडकत व इतर अधिकाऱ्यांना दिले.
यामुळे अनेक वर्षापासून उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील पिंपळे सौदागर ते वाकड परिसरात अनियमितपणे व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठाचा प्रश्न मार्गी लागला आहे. पाणीपुरवठ्याच्या वाहिनीचे उर्वरित काम युद्धपातळीवर करून पाण्याची लाईन चार्ज करून येत्या १५ ऑगस्ट स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येपूर्वी या परिसरातील नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरळीत करून देण्याची ग्वाही दिली.
आमदार लक्ष्मण जगताप यांनी समक्ष जागेवर जाऊन शेतकरी, मनपा प्रशासन, पाणीपुरवठा विभाग व काम करणाऱ्या यंत्रणेची योग्य ती सांगड घालून काम सुरू करून दिल्याने शहरातील पिंपळे सौदागर व वाकड परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
















