- भाजपला आत्मचिंतनाची गरज; अन्यथा संख्याबळ पुन्हा चारवर..
- पक्षात अस्तिव नव्हे तर, व्यक्तिव उरलं – सचिन साठे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ सप्टेंबर २०२१) :- सत्ताधाऱ्यांची दररोज भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत. जनकल्याणाचे कामे तर भाजपकडून झालीच नाहीत, मग कोणत्या मार्गाने तुम्ही सत्ता पुन्हा हस्तगत करणार आहात? हे जनतेलाही कळू द्या. पक्षाची ताकद पुन्हा शून्य झाली आहे. त्यामुळेच आगामी निवडणूक पक्षाच्या नव्हे तर त्या दोन व्यक्तींच्या जीवावर लढण्याचं स्वप्न सत्ताधारी भाजप पाहत आहे, असा टोला पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी सत्ताधारी भाजपच्या त्या दाव्यावर लगावला आहे.
भाजपाने गेल्या ५ वर्षांमध्ये लोकांच्या हिताचा कारभार केला आहे. आ. लक्ष्मण जगताप आणि शहराध्यक्ष आ. महेश लांडगे या दोन नेत्यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपा पुन्हा एकदा महापालिकेत सत्ता मिळवणार आहे. भाजपाचे ध्येय १००+ असेच राहणार आहे. बेळगावचा निकाल हा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भ्रमाचा भोपळा फोडणारा ठरणार आहे, असे पिंपरी-चिंचवड भाजपाचे मुख्य प्रवक्ते तथा संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी म्हटले होते.
यावर प्रतिक्रिया देताना सचिन साठे पुढे म्हणाले, सत्ताधारी भाजपचा पाच वर्षांचा अनुभव वाईट आहे. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. पक्षात ताकद उरली नाही. पूर्वी भाजपचे चार नगरसेवक होते. पुन्हा चारवर येउ नयेत यासाठी भाजपने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. आता पक्षात अस्तिव नव्हे तर, व्यक्तिव उरले असून त्यांच्या करिष्म्यावर निवडून येण्याची स्वप्न शहर भाजप पाहत आहे, अशी टीकाही साठे यांनी यावेळी भाजपवर केली आहे.












