- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या देखील पोटनिवडणुका होणार?..
- राज्य सरकार व निवडणूक विभागाची भूमिका निर्णायक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२१) :- जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून येत्या ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या ५ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान घेतलं जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने पुढील महिन्यात मतदान होणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून ६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकांच्या घोषणा प्रलंबित होत्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यांच्या तारखा अखेर न्यायालयाच्या निर्देशांनंतर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. एकीकडे राजकीय नेतेमंडळींनी आरक्षणाचा वाद आणि करोना या पार्श्वभूमीवर योग्य तो आढावा घेऊनच यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका आधी घेतलेली होती.
आता न्यायालयाच्या निर्देशांनुसारच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या देखील पोटनिवडणुका होणार? याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले असून राज्य सरकार व निवडणूक विभागाची भूमिका निर्णयक ठरणार आहे. शहरातील चार नगरसेवकांचे निधन झाल्याने त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. महापालिका प्रभाग एकचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे चार जुलै २० रोजी, प्रभाग क्रमांक १४ चे ‘राष्ट्रवादी’चेच नगरसेवक जावेद शेख यांचे ३१ जुलै रोजी आणि प्रभाग क्रमांक चारचे भाजप नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे २६ सप्टेंबर २० रोजी करोनाने निधन झाले. प्रभाग क्रमांक २३ च्या भाजप नगरसेविका अर्चना बारणे यांचे १३ जुलै २१ रोजी निधन झाले. एखाद्या नगरसेवकाच्या निधनानंतर सहा महिन्यांत पोटनिवडणूक व्हावी, अशी महापालिका अधिनियमात तरतूद आहे. मात्र, त्याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेत असते. त्यामुळे सत्ताधारी आणि राजकीय वर्तुळातून काय भूमिका घेतली जाईल, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.













