- बदली झालेल्या विभागात रुजू न झाल्यास वेतनावर टांगती तलवार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांच्या तब्बल ११७ शिपायांच्या दुसऱ्या विभागात बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या विभागात रुजू न झाल्यास ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिले जाणार नाही, असा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला.
महापालिकेत एकूण ४०२ शिपाई आहेत. एकाच विभागात ८ वर्षांपासून काम करणाऱ्या शिपायांची दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली आहे. निवृत्तीस ६ महिने शिल्लक असलेले तसेच, पदाधिकाऱ्यांच्या दालनातील शिपायांच्या बदल्या करण्यात आलेल्या नाहीत. कार्यकारी अभियंत्यापासून सर्वच वर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्याचा धडाका आयुक्त पाटील यांनी लावला आहे.
एकाच विभागात वर्षेनुवर्षे काम करुन अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची मक्तेदारी निर्माण झाली आहे. कामास गती देण्यासाठी आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार ३ वर्षापेक्षा अधिक काळ एकाच विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.