- भर दिवाळीत तीव्र स्वरूपाच्या कारवाईची शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑक्टोबर २०२१) :- महापालिकेच्या सर्वच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत केल्या जाणाऱ्या अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी मनुष्यबळ कमी पडत असल्याने, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला सात मजुर व पाच रखवालदार, असे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामुळे आता आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी एकूण ९८ जणांचे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर अतिक्रमण कारवाई तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी महापालिकेच्या सर्वच क्षेत्रीय कार्यालयांना मनुष्यबळाची चणचण भासत असल्याची ओरड असते. शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी शहरातील रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे, कच्चे बांधकाम, बोर्ड, बॅनर काढण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र, मनुष्यबळाअभावी प्रशासनाला या कारवाईत सातत्य ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस अतिक्रमणांमध्ये वाढ होत आहे.
या सर्व बाबींचा विचार करुन, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला सात मजूर व पाच रखवालदार असे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याच्या सुचना महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी नियुक्त केलेल्या मजूर कर्मचाऱ्यांची यादी संबंधितांना देण्यात आली आहे. याशिवाय या कारवाईकरिता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने पाच रखवालदार पुरविण्याची देखील सूचना दिली आहे.
















