- कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी-वाघेरे येथील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील सदनीकाधारकांना ताबा देण्यात आला. या प्रकल्पामध्ये १ हजार २३३ सदनीका आहेत. त्यामधील मध्यम उत्पन्न गटातील ५९५ सदनिका व उच्च उत्पन्न गटातील ३४० सदनिका अशा एकूण ९३५ सदनिकांची सोडत काढण्यात आली होती. त्या सोडतीमध्ये यशस्वी झालेल्या प्रतिनिधिक सदनिकाधारकांना चावी वितरीत करण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, काही कारणास्तव ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.
पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सर्व सदनिकाधारकांचे स्वागत केले. यावेळी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने व बी. जी. शिर्के कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक नितीन कदम यांनी या संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. प्रकल्पामध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत.
प्रातिनिधिक स्वरूपात राजेश्वर कुलकर्णी, रोहन प्रभू, शैलेंद्र धीवार, लक्ष्मी कोलते, सुधीर सावंत, रणजित कदम व इतर सदनिका धारकांना चावी देण्यात आली. यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, म्हाडाचे कार्यकारी अभियंता अनंत खेडकर, नगरसेविका उषा वाघेरे, निकिता कदम, संदीप वाघेरे, पौर्णिमा सोनवणे तसेच बी. जी. शिर्के कंपनीचे प्रमोद पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.












