- शिक्षकांना लसीकरण सक्तीचे; पालिका आयुक्तांचा शाळांना आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीचे नियमित वर्ग गुरुवारपासून (१६ डिसेंबर) सुरू करण्यास महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली. पालकमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शालेय शिक्षण विभागाने शहरी आणि ग्रामीण भागातील पहिलीपासूनचे सर्व वर्ग १ डिसेंबरपासून सुरू करण्यास मान्यता दिली होती. मात्र ओमायक्रॉनच्या संक्रमणाची शक्यता विचारात घेऊन काही स्थानिक प्राधिकरणांनी शाळा करण्याचा निर्णय १५ डिसेंबपर्यंत लांबणीवर टाकला होता. या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीचे वर्ग १६ डिसेंबरपासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच शाळा सुरू करताना घ्यायच्या काळजीसंदर्भातील मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध करण्यात आल्या.
शाळांना पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करताना शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. शाळेत स्वच्छता आणि र्निजतुकीकरण सुविधा सुनिश्चित करण्यासाठी जंतुनाशक, साबण, पाणी, तापमापक आदी साहित्य उपलब्ध करावे. शाळेत शारीरिक अंतर राखण्याबाबत, मुखपट्टीचा वापर करण्याबाबतच्या सूचना दर्शनी भागावर लावाव्यात. विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यासाठी शाळाप्रमुखांनी पालकांची लेखी संमती घ्यावी.
आरटीपीसीआर चाचणी अहवाल आवश्यक…
शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. त्या बाबतचे प्रमाणपत्र शाळेच्या दफ्तरी ठेवण्यात यावे. ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले नाही, त्यांचा ४७ तासांपूर्वीचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. शहरातील सर्व शाळा गुरुवारपासून सुरू होतील. पहिली ते सातवीचे वर्ग सुरू होतील. चर्चा करून एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शन सूचनानुसार शाळा व्यवस्थापनाने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. वर्गखोल्या आणि आवाराचे र्निजतुकीकरण करण्याची सूचना शाळा व्यवस्थापनाला देण्यात आली आहे.