- पालकांना प्रवेशासाठी या तारखेपर्यंत करता येणार अर्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२२) :- आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यासाठी आरटीई अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश दिला जातो. दरवर्षीप्रमाणे आरटीई प्रवेश प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेकडे अनेक पालकांचे लक्ष लागले आहे. याबाबतची नियमावली नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे पालकांनी त्वरित कागदपत्रे काढून घ्यावीत.
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी व मुलींसाठी प्रतिवर्षी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. यामुळे याचा फायदा सामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना होत असतो. या माध्यमातून शिक्षणासाठी क्वचितच खर्च येतो.
दरम्यान, मागील दोन वर्षांपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया ही लांबली गेली. त्याचे मुख्य कारण म्हणजे आरटीईची प्रवेशप्रक्रियेची सोडत ही एकदा जरी झाली असली तरी त्यासाठी वेटिंग लिस्टची मुदत पाच वेळा वाढवण्यात आली. यामुळे प्रत्येक वेळी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली. याचा परिणाम वेळापत्रकावर झाला.
वेळापत्रक…
■ पालकांनी ऑनलाईन अर्ज भरणे – १ ते २८ फेब्रुवारीपर्यंत, ■ प्रवेशाची सोडत ८ – ९ मार्च, ■ निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती १० ते ३१ मार्च, ■ प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश १ ते ७ एप्रिल,
मोफत प्रवेशासाठी ही कागदपत्रे महत्त्वाची…
आरटीई प्रवेशासाठी अनेक कागदपत्रे महत्त्वाची आहेत, यात निवासी पुराव्यासाठी रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज अथवा टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी एक पुरावा हा निवासी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही कागदपत्रे अपूर्ण असतील, तरच निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करार पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.


















