- थम्ब इम्प्रेशन हजेरीतील सवलत रद्द…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२२) :- महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी प्रशासकीय शिस्त आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ऑनड्युटी असताना स्थानावर नसणे, मस्टरला सही वेळेवर न करणे याविषयी महापालिकेने मोहीम राबविली. त्यात १०४ जण दोषी आढळले आहेत. त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे.
पिंपरी – चिंचवड शहरात ओमायक्रॉन, कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढल्याने महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक थम्ब इम्प्रेशन हजेरीत ३१ जानेवारी २०२२ पर्यंत सवलत दिली होती. त्याबाबतचा आदेश ११ जानेवारी रोजी काढला होता. थम्ब इम्प्रेशन नसले, तरी अधिकारी, कर्मचाऱ्यांना हजेरी पटावर नियमितपणे निश्चित केलेल्या कार्यालयीन वेळेत दैनंदिन स्वाक्षरी करणे बंधनकारक केले होते. त्यात सवलतींचा गैरफायदा घेत कर्मचारी कार्यालयीन वेळेत बाहेर फिरत होते. कर्मचारी कँटीनसह बाहेर फिरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यासाठी प्रशासनाने एक पथक नेमून चौकशी केली.
थम्ब इम्प्रेशन हजेरीत सवलत दिलेला ११ जानेवारीचा आदेश रद्द करण्यात आला. महापालिका आस्थापनेवरील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना फेस रिडिंग मशीनद्वारे बायोमेट्रिक हजेरी नोंदविणे बंधनकारक व सक्तीचे केले आहे. ज्या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. त्या ठिकाणी फेस रिडिंग उपस्थिती नोंदविणे बंधनकारक राहणार आहे.
कोरोनाबाबत नियम पाळणे आवश्यक आहे. सर्व संबंधित विभागप्रमुख शाखाप्रमुखांनी हे परिपत्रक विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास द्यावे, महापालिकेची फेसरिडींग मशीन सुस्थितीत ठेवण्याची खबरदारी माहिती व तंत्रज्ञान विभागाने घ्यावी, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. अनेक विभागातील तब्बल १०४ कर्मचाऱ्यांनी हजेरी पत्रकावर स्वाक्षरी केली नसल्याचे आढळून आले.











