न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ फेब्रुवारी २०२२) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (राज्य मंडळ) बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध करण्यात आली आहेत. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्याची मुद्रित प्रत करून आजपासून (९ फेब्रुवारी) विद्यार्थ्यांना वितरण करायचे असून, प्रवेशपत्रासाठी वेगळे शुल्क घेऊ नये असे, राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावीची लेखी ऑफलाइन परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहे. त्याची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ दरम्यान होणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा ४ ते ३० मार्च दरम्यान होणार असून १४ ते ३ मार्चदरम्यान श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा होणार आहे.
राज्य मंडळाकडून https:// www. mahasscboard. in/ या संकेतस्थळावर दुपारी एक वाजल्यापासून कॉलेज लॉगिनमध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी या प्रवेशपत्रांच्या मुद्रित प्रतीवर मुख्याध्यापक-प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करून विद्यार्थ्यांना द्यावी. त्यासाठी वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्रात बदल असल्यास त्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यायचे आहेत. प्रवेशपत्र गहाळ झाल्यास शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्राची पुन्हा मुद्रित प्रत करून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा मारून विद्यार्थ्यांना द्यावे. छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्याथ्र्याचे छायाचित्र चिकटवून मुख्याध्यापक-प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करून विद्यार्थ्यांना द्यावी, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.











