न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ फेब्रुवारी २०२२) :- महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या दोन्ही महत्वाच्या ४०० केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये ५ ठिकाणी बुधवारी पहाटे ४.३० च्या सुमारास बिघाड (ट्रीपिंग) झाला. पिंपरी व चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात सकाळी ६ वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित झाला होता, तो आता सुरळीत होताना दिसून येत आहे.
अतिशय दाट धुके व दवं यामुळे या टॉवर लाईन मध्ये बिघाड झाल्याची शक्यता असल्याचे महापारेषणकडून सांगण्यात आले. तसेच महत्वाचे दोन ४०० केव्ही अतिउच्च दाब उपकेंद्र बंद असल्याने पर्यायी वीज पुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकली नाही.
दरम्यान महावितरणकडून याबाबतची माहिती वीज ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे देण्यात आला. त्यामुळे सकाळी पाणी व इतर उपकरण चालू करता न आल्याने नागिरकांची अडचण निर्माण झाली होती.











