- शहरातील युवकांना मिळणार डिजिटल अभ्यासक्रमाचे धडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२२) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी चिंचवड यांच्यामार्फत पिंपरी महापालिका कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांना रोजगारक्षम अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी स्कील डेव्हलपमेंट अंतर्गत सामंजस्य करार करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील अभियांत्रिकी, पदवीधर, विद्यार्थी, युवकांना पूर्ण वेळ रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळण्याच्या हेतूने हा अभ्यासक्रम सुरु केला. त्यात चार कोर्सचा समावेश केला होता. इंजिनिअरिंग, डिप्लोमा आणि शाखेतून पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांना या कोर्सेसचा लाभ घेता येणार आहे. बिग डेटा हड्डूप अॅन्ड स्पार्क डेव्हलपमेंट एक्सपर्ट, डेटा सायन्स विथ पायथनएक्सपर्ट, डेटा सायन्य विथ आर प्रोग्रॅमिंग एक्सपर्ट, गुगल एडवर्ड एक्सपर्ट, सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन एक्सपर्ट, सोशल मीडिया एक्सपर्ट, टेस्ट अॅटोमेशन विथ सिलेनिअम एक्सपर्ट असे अभ्यासक्रम सुरू आहेत. औद्योगिक क्षेत्रासाठी कार्यक्षम मनुष्यबळ निर्माण करणे, जागतिक स्तरावर रोजगाराभिमुख व कौशल्यावर आधारित मॉडयूल तयार करणे, हा या अभ्यासक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन माध्यमातून रोजगारनिर्मिती होत आहे. यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी स्मार्ट ट्रेनिंग अँड इनोव्हेशन सेंटर (स्टिक) द्वारे सुरु करण्यात आलेल्या उपक्रमाकडे एक व्यासपीठ म्हणून पाहिले जात आहे. आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने स्मार्ट ट्रेनिंग आणि इनोव्हेशन सेंटर स्थापन केले आहे. पुणे विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणाबरोबरच काळानुसार अद्ययावत ज्ञान देण्यासाठी स्मार्ट ट्रेनिंग आणि इनोव्हेशन सेंटर स्टिक व्यासपीठाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत, असे आयुक्त तथा स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील म्हणाले.