- चार पीडित महिलांची सुटका; स्पा सेंटर मॅनेजरला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२२) :- पिंपळे सौदागर येथील साई चौक, जगताप डेअरी येथे कॅसल स्पा ॲण्ड वेलनेस सेंटर येथे स्पाच्या नावाखाली महिलांकडून पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून पडताळणी केली.
त्यानंतर सापळा रचून छापा टाकून कारवाई केली. यात पश्चिम बंगालच्या दोन तसेच महाराष्ट्रीय दोन महिला अशा चार पीडित महिलांची सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी सहा हजार २०० रुपयांची रोकड, १४ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, असा २० हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शुक्रवारी (दि. १) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे ही कारवाई केली. शनिवारी (दि. २) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आलीम उद्दीन अब्दुल समद (वय २५, रा. वडगाव शेरी रोड, विमाननगर, पुणे, मूळ रा. आसाम), असे अटक केलेल्या स्पा सेंटर मॅनेजरचे नाव आहे. त्याच्यासह स्पा मालक असलेल्या महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.