न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०२२) :- शासन निर्णयानुसार पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करीत राहील, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.
चिंचवड येथील झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन कार्यालयामध्ये मिलिंदनगर येथील पुनर्वसन प्रकल्प अंतर्गत असलेल्या इमारतीमधील सदनिकांची संगणकीय सोडत आयुक्त पाटील यांच्या हस्ते पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सक्षम प्राधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी, दत्तात्रय रामगुडे, किशोर महाजन, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, माजी नगरसदस्य अरुण टाक, माजी नगरसदस्या निकिता कदम यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
आयुक्त पाटील म्हणाले, लाभार्थ्यांना घरे देण्याचा आनंदाचा क्षण आहे. चांगले घर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रक्रीया सुरु झाली आहे. पात्र ठरलेल्या सर्व लाभार्थ्यांना सदनिका दिल्या जातील. महापालिकेने सर्व सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी शांतता ठेवण्या बरोबरच तेथे स्वच्छता ठेवण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने आपली भूमिका पार पाडावी असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले.
सदनिकांच्या सोडतीमध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना मुलभूत सुविधांसह घरे उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील राहील. लाभार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या सदनिकांचा सुयोग्य वापर केला पाहिजे. आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची त्यांनी दक्षता घेतली पाहिजे असे आयुक्त पाटील यांनी सांगितले. सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील काळात घरे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत असेही ते म्हणाले.
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीकरण मिशन (JNNURM) अंतर्गत केंद्रशासन, राज्यशासन, महापालिका आणि लाभार्थी झोपडपट्टीधारक यांच्या सहकार्याने मिलिंदनगर येथे पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात येत आहे. या पुनर्वसन प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या पाच इमारतींपैकी चार इमारतींमधील सदनिकांचे वाटप यापूर्वी करण्यात आले असून सन २००२ च्या मशाल सर्वेक्षणानुसार ११२ लाभार्थ्यांना सदनिकांचे आज वाटप करण्यात आले आहे. या पात्र लाभार्थ्यांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसह अंध, दिव्यांग, महिला यांचाही समावेश आहे.