मुंबई (दि. ११ फेब्रु.) :- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीची मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहावर आज सोमवार (दि. ११) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या बैठकीत समितीचे सचिव राज्यमंत्री मधुकर कांबळे यांनी स्मारकाच्या आजपर्यंत झालेल्या कामाचा आढावा सादर केला. स्मारक कसे असावे? या विषयीची चित्रफीत दाखवली व स्मारकाचे पुढील कामे व निधीची मागणी त्यांनी यावेळी केली.
स्मारक समितीचे सदस्य अमित गोरखे यांनी सांगितले की, स्मारक समितीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून शासकीय लेखाधिकारी नेमण्यात यावा. तसेच शासन स्तरावर स्मारकाचे बांधकाम विकासक न नेमता पूर्ण करावे. आहे त्या ऐतिहासिक जागी स्मारकाचे काम त्वरित चालू करावे. तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शंभराव्या जयंती महोत्सवाला १०० कोटी रु. शासनाने अनुदान द्यावे व पुण्यातील क्रांतिवीर लहुजी स्मारक समितीसाठीच्या जमीन हस्तांतरित करण्यासाठी निधी व शासकीय कार्यालय पुणे येथे चालू करावे, अशी सूचना केली.
अण्णाभाऊ साठे महामंडळाचे थकीत कर्ज केंद्राला देऊन समाजातील वंचित कुटुंबाना त्वरित हवे त्याला कर्ज योजना महामंडळाच्या तर्फे चालु करावी, तसेच अण्णाभाऊंचे साहित्य प्रकाशन समिती पुनर्स्थापित करून, पुढील साहित्याची त्वरित छपाई करावी, असेही गोरखे यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, बार्टी मार्फत समितीला त्वरित निधी उपलब्द्ध करा, स्मारकाचे काम विकासकाऐवजी स्वतः शासनाच्या बांधकाम विभागाने करावे. जेणेकरून कामात कुठलाही भ्रष्टाचार होणार नाही. तसेच क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीसाठी आरक्षित जमिनीची भूसंपादन प्रक्रिया त्वरित राबवून मूळ मालकांना त्यांचा परतावा ताबडतोब द्या. जेणेकरून स्मारकाचे काम लवकर चालू करता येईल. तसेच लहुजींच्या स्मारक समितीलाही निधी त्वरित उपलब्ध करा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले आहेत.
यावेळी समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री दिलीप कांबळे, समितीचे सदस्य आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार संजय कुटे, आमदार सुधाकर भालेराव, अमित गोरखे, शंकर कांबळे, समाजकल्याण मनपा तसेच बार्टी चे मुख्य अधिकारी आदी उपस्थित होते.










