- ती घटना घडल्यानंतर पोलिसांना केलाय ‘फतवा’ जारी?..
- मग कारवाई कागदावरच राहीली तर, पुढे काय?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ जून २०२६) :- दापोडी-फुगेवाडी परिसरातील विषारी दारूकांडानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय खडबडून जागे झाले असून, शहरातील सर्व पोलीस निरीक्षकांना त्यांच्या हद्दीत कोणतेही अवैध धंदे सुरू नसल्याचे दरमहा लेखी प्रमाणपत्र (अहवाल) सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या निर्णयामुळे पोलीस प्रशासनाच्या पूर्वीच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शहरात अवैध दारू विक्री, मटका, जुगार अड्डे आणि इतर बेकायदेशीर धंद्यांबाबत सातत्याने तक्रारी होत असताना आतापर्यंत ठोस कारवाई का झाली नाही, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. दापोडीतील गंभीर घटना घडल्यानंतरच अशी कठोर भूमिका घेण्याची वेळ का आली, याबाबतही चर्चा सुरू आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी खोटा अहवाल सादर करणाऱ्या अथवा हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचे आढळल्यास संबंधित पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरले जाईल, असे स्पष्ट केले आहे. मात्र यामुळे आतापर्यंत संबंधित भागातील अवैध धंद्यांची जबाबदारी नेमकी कोणाची होती, हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.
विशेष म्हणजे, दरमहा लेखी अहवाल घेण्याची गरज निर्माण झाली असल्याने आतापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरील वास्तव परिस्थितीची माहिती नव्हती का, अशीही चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.
मग पुढे काय?…
दापोडी दारूकांडानंतर घेतलेल्या या निर्णयामुळे प्रशासनावरील दबाव वाढला असून, पुढील काळात प्रत्यक्ष कारवाई होते की केवळ कागदोपत्री अहवालांपुरतीच मोहीम मर्यादित राहते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.














