- विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ४ जून २०२६) :- पुणे विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात मोठी राजकीय घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस (सुनेत्रा पवार गट)चे उमेदवार विक्रम काकडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. पक्षप्रवेश केल्यानंतर अवघ्या दोन तासांत उमेदवारी मिळविणाऱ्या काकडे यांनी आवश्यक राजकीय गणित जुळवत तीन दिवसांतच विजयाची स्थिती निर्माण केली आहे.
या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक घडामोड म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः दूरध्वनीवरून पाटील यांच्याशी संपर्क साधत माघार घेण्याचा सल्ला दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सुरुवातीपासूनच ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षात अनेक निष्ठावंत इच्छुक असतानाही विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पक्षातील काही नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. दुसरीकडे शरद पवार गटाने श्रीकांत पाटील यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपचे बंडखोर प्रदीप कंद यांच्यासह अन्य काही उमेदवारांनीही अर्ज दाखल केले होते.
मात्र, अंतिम टप्प्यात राजकीय समीकरणे वेगाने बदलली आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे विक्रम काकडे यांच्या बिनविरोध निवडीची केवळ औपचारिकता शिल्लक राहिल्याचे मानले जात आहे. दरम्यान, या संपूर्ण घडामोडींवर काँग्रेस पक्षाने नाराजी व्यक्त केल्याची चर्चा असून, पुण्यातील राजकीय वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे.















