- कॅनबे चौकातील घटना; कंटेनर चालक गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२२) :- देहूहून आळंदीकडे पायी जात असलेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव कंटेनर शिरला. यामध्ये एका वारकऱ्याचा मृत्यू झाला. तर तीन वारकरी जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. २०) देहू-आळंदी मार्गावरील चिखलीजवळ घडली.
भगवान साहेबराव घुगे (वय ३०, रा. दगडवाडी, ता. देऊळगावराजा, जि. बुलढाणा) असे या अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे. तर बबन जयभाये, पुंजाबाई हुसे, भिकाजी बनसोडे (सर्व रा. दगडवाडी, ता. देऊळगावराजा, जि. बुलढाणा) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी भास्कर बाजीराव जायभाये यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार कंटेनर चालक जगन्नाथ भानुदास मुंडे (वय ४२, रा. म्हेत्रे वस्ती, चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास मृत घुगे, जखमी व इतर सहकारी हे देहू येथे दर्शन घेवून आळंदीच्या दिशेने पायी जात होते. त्यावेळी कॅनबे चौक ते चिखली या दरम्यान भरधाव कंटेनरने चौघांना धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने घुगे यांचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून कंटेनर चालकाला अटक केली आहे.