- पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये पालकांनी गिरविले योगासनांचे धडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२२) :- भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या योगाला आज जगभरात मोठं महत्व मिळालं आहे. आजच्या आधुनिक युगात, व्यग्रतेमध्येही योगासनं शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. सर्व शारीरिक आणि मानसिक आजारांना शरीरापासून दूर ठेवण्यासोबतच योगाचा प्रत्येकाच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो. नियमितपणे प्राणायामपूरक योगासनं केल्यानं शारीरिक आणि मानसिक उर्जेच्या विकासासोबत तणाव आणि नैराश्यही कमी होतं, असे मत चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या उपाध्यक्षा सौ. अनिताताई संदीप काटे यांनी व्यक्त केले.
पिंपळे सौदागर येथे सौ. अनिताताई संदीप काटे आणि निलेश काटे युवा मंचच्या वतीने खास पालक वर्गासाठी आठव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त मंगळवारी (दि. २१) रोजी चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या आवारात विशेष योगसत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अनिताताई काटे बोलत होत्या. यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काटे, योग प्रशिक्षक गिरीश जोशी, चारुहास कुलकर्णी, शाळेच्या योग शिक्षिका प्रीती मुकाटी, नृत्यशिक्षक देवयानी शिंदे, शाळेच्या प्राचार्या सुषमा उपाध्ये, प्री प्रायमरी विभाग प्रमुख पलक गांधी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
दरम्यान सकाळी सहा वाजता योगवर्गास प्रारंभ झाला. रिमझिम पाऊस पडत असतानाही पालकवर्गाने प्रत्यक्ष भाग घेऊन विविध प्राणायाम व योगासने करण्याचा आनंद लुटला. योग प्रशिक्षक जोशी सर आणि त्यांचे सहकारी यांनी पालकांना आसनांचे प्रकार, प्राणायाम, ओंकार याची प्रात्यक्षिके करून दाखविली. खास विद्यार्थ्यांसाठी दुसरे सत्र सकाळी ९:३० वा. आयोजित केले हॊते. चारुहास कुलकर्णी यांनी सूर्यनमस्कार, ओंकार यांचे महत्व विशद केले. पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत शंकांचे निरसन केले. शाळेच्या योग शिक्षक प्रीती मुकाटी, नृत्यशिक्षक देवयानी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी बहारदार प्रात्यक्षिके व नृत्य सादर केले.