न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२२) :- तत्कालीन पिंपरी-चिंचवड महापालिका परिवहन विभागातील (पीसीएमटी) व सध्याच्या पुणे महानगर परिवहन
महामंडळाच्या (पीएमपी) ११८ कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायम करण्याचा निर्णय आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला आहे. त्यांना महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व लाभ देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्याबाबतचा आदेश मंगळवारी (दि. २१) प्रशासन विभागास दिला आहे.
पीसीएमटीचे २३५ कर्मचारी १९९९ मध्ये तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेकडे तत्कालीन आयुक्तांनी वर्ग केले होते. पीसीएमटी व पीएमटी विलगीकरणानंतर अस्तित्वात आलेल्या ‘पीएमपी’त कर्मचाऱ्यांचा समावेश झाला होता. त्यातील ११७ कर्मचारी आतापर्यंत सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त झाले आहेत. उर्वरित ११८ कर्मचारी सद्यःस्थितीत महापालिका सेवेत कामकाज करीत आहेत. त्यांची जवळपास २० वर्षे सेवा झाली आहे. त्यांना महापालिका सेवेत सामावून घ्यावे व इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधांचा लाभ मिळावा, असा ठराव महापालिका सभागृहात झाला होता.
त्यानंतर सरकारकडे पत्रव्यवहार केला होता. या कर्मचाऱ्यांमध्ये शिपाई, हेल्पर, क्लीनर, वाहनचालक, लेबर आदींचा समावेश होता. या ११८ कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायम करून नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना सर्व लाभ देण्याचे आदेश नगरविकास विभागाच्या सचिव प्रियांका कुलकर्णी- छापवाले यांनी दिला आहे. त्यानुसार, आयुक्त पाटील यांनी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा आदेश दिला.