न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांना २० हजार रुपये किमतीचा मोबाईल मोफत दिला जाणार आहे. विशेष म्हणजे हे मोबाईल पुन्हा महापालिकेत जमा करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे या निर्णयाचे लोकप्रतिनिधींकडून स्वागत केले जात आहे. पदाधिकाऱ्यांना प्रथम मोबाईल खरेदी करून त्याची जीएसटीसह पावती जमा करावी लागणार आहे. त्यानंतर त्यांच्या खात्यात २० हजार रुपयांची रक्कम जमा होणार आहे.
नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करणाऱ्या लोकप्रतिनिधींना २० हजार रुपयांच्या मोबाईल हे बक्षीस देण्यात येत आहे. याबाबत असलेल्या धोरणामध्ये सुधारणा करत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी त्याला मंजुरी दिली. महापालिकेमध्ये महापौर, उपमहापौर, सत्तारूढ पक्षनेते, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते, विधी सभापती, शहर सुधारणा सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती, शिक्षण, जैवविविधता सभापती यांच्यासह आठ प्रभागांतील सर्व अध्यक्षांना महापालिकेकडून विविध सोयी सुविधा देण्यात येतात. त्यामध्ये मोबाईलचा देखील समावेश आहे.
अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी मोबाईल संचाचे मोफत वाटप केले जात होते. पालिकेच्या विद्युत विभागाचे सन २००७ चे धोरण आहे. मोबाईलची खरेदी मध्यवर्ती भांडार विभागाकडून केली जात होती. या धोरणात सुधारणा करण्यात आली आहे. यापुढे मोबाईल संच अधिकाऱ्यांना दिले जाणार नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
यापूर्वी महापालिकेच्या भांडार विभागाकडून मोबाईल खरेदी करून ते अधिकारी व पदाधिकाऱ्यांना देण्यात येत होते. महापालिकेच्या भांडार विभागाने सन २०१२ पासून आजपर्यंत सुमारे ३० लाख ३८ हजार ४८० रुपयांचा खर्च केला आहे. यापूर्वी अधिकारी व पदाधिकाऱ्यांना दिलेले मोबाईल पुन्हा भांडार विभागाकडे जमा करावे लागत होते.
महापालिकेकडून मोबाईल घेऊन तो पुन्हा जमा न कल्याचा घटना उघडकीस आली होती. भांडार विभागाने आतापर्यंत १५५ मोबाईल खरेदी केले होते. सुमारे १०० पदाधिकाऱ्यांनी पुन्हा मोबाईल जमा केले नव्हते. मोबाइल खराब झाला. हरवला अशी कारणे दिली होती. पुन्हा हे मोबाईल जमा करायचे नसल्याने पदाधिकाऱ्यांनी मोबाईल स्वतःकडेच ठेवले आहेत. त्यांना दिलासा मिळाला.