- बेशिस्तांना येते ऑनलाइन कारवाईबाबत नोटीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२२) :- बेशिस्त वाहनचालकांवर पिंपरी – चिंचवड वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. यंदा जानेवारी ते जुलै या महिन्यांच्या कालावधीत पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर मोठी दंडात्मक कारवाई केली. यातील २६ कोटी ५४ लाख ५ हजार ६५० रुपयांचा दंड अद्यापही वाहनचालकांनी भरलेला नाही. अशा वाहनचालकांना नोटीस पाठवण्यात येत असून, त्यांना न्यायालयात खेचण्यात येणार आहे.
शासनाने मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम पालनाला अधिक महत्त्व दिले. वाहतूक नियमांचा भंग करू नये, म्हणूनच जबर दंड आणि वाहन परवाना निलंबन व खटला दाखल करण्याची तरतूद केली. मात्र, तरीही बेशिस्त वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे. दंड भरता की, खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करून कोर्टात खेचू, असा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे.
ज्या वाहनधारकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडाचा मेसेज किंवा नोटीस प्राप्त झाली आहे. त्या वाहनधारकांनी त्वरित वाहतूक शाखा, वाहतूक कर्मचारी किंवा ऑनलाइन स्वरुपात दंड भरून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. त्यांना ऑनलाइन दंड केला असून, त्या दंडाबाबत मोबाइलवर मेसेज केला जात आहे. किती रुपयांचा दंड केला, त्याबाबत कळविले जाते. त्यानंतर दंड भरण्यासाठी मोबाइलवर किंवा समक्ष पोस्टाद्वारे नोटीस पाठविली जाते. वाहतूक नियम मोडलेली तारीख, वेळ स्थळ व दंडाचा समावेश असतो.












