न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२२) :- किशोरवयीन वयोगटातील मुली मध्ये शारीरिक व मानसिक बदल होत असतात. त्यांना अनेक प्रश्न व शंका निर्माण होत असतात. परंतु आपल्या समाजात लैंगिक ह्या विषयावर मोकळेपणाने बोललेच जात नाही. लैंगिक विषयावर असलेला गैरसमजुती वाढीस लागून त्याचे मानसिक व शारीरिक आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती असते. मुलींचे मानसिक व शारीरिक आरोग्य हे निरोगी व सशक्त असायला हवे. म्हणून किशोरवयीन वयोगटातील मुलींना योग्य मार्गदर्शनाची गरज ओळखून रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने मराठवाडा मित्रमंडळ माध्यमिक विद्यालय काळेवाडी येथे आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यासाठी यशवंतराव चव्हाण स्मृतीरुग्णालय ( YCM ) विभागाचे आरोग्यतज्ञ मा. संदीप कामठे यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.मा. संदीप कामठे यांनी उपस्थित किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक समस्या, वैयक्तिक स्वच्छता, होणारे शारीरिक बदल व मासिक पाळी विषयी समस्या आदी विषयाबाबत आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. मुलींच्या शंका व समस्या जाणून घेऊन त्याचे निरसन केले.
रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे म्हणाले, विद्यार्थिनींनी आपल्या आई, शिक्षिका यांच्याशी मैत्रीपूर्वक चर्चा केली पाहिजे. आपल्या आरोग्यविषयक समस्या विद्यार्थीनींनी मनमोकळपणाने आपल्या आई व शिक्षिका यांना सांगितल्या पाहिजेत. तसेच आरोग्यविषयक बाबतीत कोणतेही अज्ञान अंधश्रद्धा, भीती न बाळगता त्या गोष्टी वैज्ञानिक पद्धतीने अभ्यासून त्यांचे निराकरण केले पाहिजे.
मराठवाडा मित्रमंडळ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वाल्हेकर मॅडम यांनी आभार व्यक्त करताना म्हणाल्या, रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या माध्यमातून स्तुत्य असा उपक्रम आमच्या विद्यालयात राबवण्यात आला या कार्यक्रमाचा विद्यार्थिनींना निश्चित फायदा होईल. विद्यार्थी / विद्यार्थिनी यांच्या हिताकरिता असे सामाजिक/मार्गदर्शनपर उपक्रम रयत विद्यार्थी विचार मंच व मराठवाडा मित्रमंडळ माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातुन सातत्याने राबवण्यात येतील.
यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचा,शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस.एल. शिंदे मॅडम यांनी केले यावेळी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,धम्मराज साळवे प्रदेश महासचिव संतोष शिंदे, सदस्य माधवी खरात, व मराठवाडा मित्रमंडळ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वाल्हेकर मॅडम तसेच भालशंकर मॅडम, एस.एल. शिंदे मॅडम,चव्हाण मॅडम, ए.पी.शिंदे मॅडम, पिसाळ मॅडम ,एस.यु.शिंदे मॅडम, पाटील मॅडम, देवकर सर, शिंदे सर उपस्थित होते.