न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२२) :- आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द इथल्या एका शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर दहावीतील विद्यार्थ्याने भरदिवसा शाळेतच कोयत्याने वार केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा दहावीतल्या विद्यार्थ्याशी महिनाभरापूर्वी शाळेतच वाद झाला होता. शिक्षकांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटवण्यात आला. पण याचा राग दहावीच्या विद्यार्थ्याने मनात ठेवला होता. वादाचा बदला घेण्यासाठी दहावीतल्या विद्यार्थ्याने चक्क शाळेत कोयता आणला.
नववीतल्या विद्यार्थी शाळेत असताना त्याच्या पाठिमागून कोयत्याने तीन ते चार वार केले. या हल्ल्यात मुलाच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी मुलाच्या डोक्याला ७ तर हाताला ४ टाके पडले असून त्याच्यावर मंचर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.