न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रु.) :- मोशी येथे गॅस सिलेंडरचा रेग्युलेटर खराब असल्याने गॅस गळती होत असल्याची तक्रार करूनसुद्धा, वैष्णवी गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्याने अंगकाढूपणा केला व रेग्युलेटर दुरुस्ती न करता गॅस चालु कऱण्यास सांगितले. त्यामुळे दुर्घटना घडली. या एजन्सी चालकावर कारवाई करण्याची मागणी छावा संघटनेच्या वतीने धनंजय जाधव यांनी केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छावा संघटना गेली चार वर्षांपासून अनधिकृत गॅस विक्री, रिफिलिंग करताना होणारे स्फोट, कर्मचारी व ग्राहकांबाबत बाळगली जाणारी निष्काळजी, अवाजवी शूल्क आकारणी, परवाना नसताना गॅस वितरण याविरोधात वारंवार आवाज उठवत आहे. मात्र, त्याकडे अन्न व पुरवठा विभागाने दुर्लक्ष केले.
चिखली येथे सिलिंडर रिफिलिंग करताना एका व्यक्तीचा बळी गेला. त्यानंतर मोशी येथे वैष्णवी गॅस एजन्सीमध्ये स्फोटाची घटना घडली. संबंधित एजन्सी सील करुन एजन्सी चालकावर कायदेशीर कारवाई करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.















