न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना असे सूचित करण्यात येते की, स्वच्छ भारत/महाराष्ट्र अभियान (नागरी) कार्यक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण- २०२३ ची अंमलबजावणी सुरु आहे. त्याअनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरास WATER PLUS प्रमाणिकरण प्राप्त व्हावे यासाठी महापालिका तयारी करत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील सेप्टिक टँक स्वच्छतेचे काम करणाऱ्या ठेकेदार/ Desluding Operator यांना सूचित करण्यात येते की, त्यांचे काम सुरू करण्यापूर्वी, त्यांच्या कामाच्या स्वरूपाच्या आधारे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत अनौपचारिकरित्या काम करताना, असुरक्षितरित्या काम करताना किंवा मैला उघड्यावर उत्सर्जित करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, मलकुंड टाकीच्या क्षमतेनुसार, त्यात साचलेला मैला ३ वर्षांच्या नियमित कालावधीत महापालिकेने मान्यता दिलेल्या प्रतिनिधी संस्था / ठेकेदारांकडूनच उपसणी केली पाहिजे किंवा महापालिकेची मदत घेऊन विशिष्ट शुल्क भरून मैला उपसा करून घेणे अनिवार्य आहे. याकरीता निवासी इमारतीय र.रु.१५००/- (प्रति खेप) व व्यावसायिक इमारतीय र.रु.२५००/- (प्रति खेप) इतके सेवाशुल्क आकारण्यात येणार आहे.
याकरीता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील खाजगी मलकुंड टाक्या (सेप्टिक टँक) उपसणे/स्वच्छतेसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या वाहनांचा (सुलेज व्हॅनचा) वापर करता करावयाच्या झाल्यास मनपाच्या https://www.pcmcindia.gov.in/ > RESIDENTS> Citizens Facilitation Centre> CFC online application> Download forms> आरोग्य विभाग> सेप्टिक टँक उपसणे येथे नागरिकांनी अर्ज बनवून वरीलप्रमाणे शुल्क भरावे व जवळच्या नागरी सुविधा केंद्रात (Citizens Facilitation Centers) जाऊन अर्ज करावा आणि शहराच्या घनकचरा व्यवस्थापनास सहकार्य करावे.
तसेच मलमूत्र /सांडपाणी /मलकुंड स्वच्छ केल्यावर गोळा केलेला मलगाळ यांचा उत्सर्ग खाजगी गटारे/ मलवाहिनी याद्वारे पावसाळी पाण्याच्या वाहिन्या, रस्ता, मोकळ्या जागा, जलसाठे, जलमार्ग, शेतजमीन अथवा अन्य अवांच्छित ठिकाणी उत्सर्जित केल्यास घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी.
















