न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च) :- क्रांतीवीर महात्मा जोतिबा फुले यांनी प्रथम स्व:ताच्या पत्नी सावित्रीबाईंना सुशिक्षित केले. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकरांनी दाखवून दिलेल्या मार्गाने महाराष्ट्र सर्व क्षेत्रात आघाडीवर राहिला. देशाला प्रथम महिला राष्ट्रपती महाराष्ट्रानेच दिला. महिलांनी देखील सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने वेळ प्रसंगी पुरुषांपेक्षा कणभर जास्तच जबाबदा-या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत.
राज्यात पुरुष शेतक-यांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना आहेत. परंतू महिला सर्व संकटांचा सामना कणखरपणे करताना दिसतात. आज शहरी भागाबरोबरच ग्रामिण भागातही महिला नोकरी, उद्योग, व्यवसायात पुढे असल्याचे दिसते. अशा महिलांना प्रोत्साहन द्यायला हवे असे प्रतिपादन माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. ८ मार्च) पुनावळे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रात कार्यरत असणा-या महिला भगिनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे संजोयक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय सायकर आणि माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्या हस्ते सत्कारार्थींना सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बापूसाहेब कारंडे, गायत्री कारंडे, शिल्पा आनपान, रेश्मा कुदळे, तृप्ती सायकर, शिवांजली कळमकर, राणी निकम आदी उपस्थित होते.
स्वागत तृप्ती सायकर, सुत्रसंचालन शिल्पा आनपान आणि आभार पंकज खटाणे यांनी मानले.











