समाजाप्रतीचे देणे प्रत्येकाने ओळखणे गरजेचे – रेणुताई गावस्कर
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च) :- प्रत्येकाने समाजप्रतीचे स्वतःचे देणे ओळखून त्यासाठी कृतिप्रवण बनले पाहिजे, असे मत रेणुताई गावस्कर यांनी व्यक्त केले. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिटीटूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सच्या वतीने चिंचवड येथील संस्थेच्या सभागृहात जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
यावेळी त्यांनी त्यांच्या ‘एकलव्य न्यास’ संस्थेच्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी त्या म्हणाल्या, ‘एकलव्य न्यास’ या संस्थेत कधी आई-वडील नसलेली मुलं आली. देवदासींची, व्यसनी व्यक्तींची मुलं आली व अक्षरश: रस्ता हेच घर असणारी मुलंही आली. आमचं असं एक मोठं घर बनलं. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हणतात. इथं मला प्रत्येक असहाय मुलामागे एक तेवढीच असहाय आई दिसत होती. त्या बाईचं हिमोग्लोबिन चिंता वाटावी किंवा भीती वाटावी इतकं कमी होतं. तरीही ना गर्भारपण वा बाळंतपण यांच्या चक्रातून ती सुटू शकत होती की नवऱ्याच्या मारापासून स्वत:चा बचाव करू शकत होती. देहविक्रयाच्या खाईत लोटल्या गेलेल्या स्त्रियांचे प्रश्न तर त्याहून वेगळे होते.
मुलं आणि स्त्रिया व त्यांची टोकाची वंचितता बघताना मला फार अस्वस्थ वाटायचं. आयुष्यातील अगदी साध्यात साध्या सुंदर क्षणाला वंचित झालेली ही माणसं त्यांना हे दुर्मीळ आनंदाचे क्षण मिळवून देण्यासाठी मनाचा दृढनिश्चय कधी झाला कळलंच नाही. त्यांच्या जगाचाच एक भाग बनून गेले आणि माझ्या घराच्या संकुचित भिंती विस्तारत गेल्या. आपण प्रत्येकानेही आपापल्यापरीने आपल्याला शक्य होईल तितके थोडे का होईना प्रयत्न आपल्या सभोवतीचे जग सुंदर करण्यासाठी, त्यातील अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, अशा कामातून मिळणारा आनंद हा नक्कीच मोठा असतो याचा अनुभव घ्या असेही रेणुताई म्हणाल्या.
याप्रसंगी ‘काम व आयुष्य यातील समतोल’ (वर्क लाईफ बॅलन्स) या विषयावर आयोजित परिसंवादात दीप्ती शेजवलकर, मनुष्यबळ व्यवस्थापक नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी, दीप्ती चंद्रचूड, मार्केटिंग हेड क्वालिटी पेंट्स, मनीषा सबनीस, असिस्टंट जनरल मॅनेजर, कॉसमॉस बँक, मुंबई रिजन,व डॉ. संज्योत देशपांडे, समुपदेशिका, नाईट कोल्ह्टकर, योग्य प्रशिक्षक या पाचही महिला वक्त्यांनी परिसंवादात आपापल्या कार्यक्षेत्रातील अनुभव सांगत मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे संचालक डॉ. मिलिंद मराठे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस, संस्थेच्या मनुष्यबळ व्यवस्थापक मुक्ता हुपरीकर, डॉ. सुनीता पाटील यांच्यासह सर्व अध्यापक वर्ग, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी अपर्णा वठारे हिने केले. तर या कार्यक्रमासाठी आदिती चिपळूकर यांनी विशेष सहकार्य केले.











