- पालकांना या कागदपत्रांसह या मुदतीत करावा लागणार अर्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०२३) :- शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया लागू असणाऱ्या शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया आज सोमवार (दि. २३) पासून सुरू करण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकांना अर्ज करता येतील.
यंदा ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेत खासगी शाळांना २३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण केल्यानंतरच पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. प्रक्रियेत प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नवीन खासगी शाळांचा तीन वर्षांपर्यत ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेत समावेश करू नये. या शाळांची शैक्षणिक तपासणी आणि पडताळणी पूर्ण केल्यानंतरच, त्यांचा समावेश प्रक्रियेत करण्यात यावा, असेही प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे. अर्ज भरल्यानंतर, त्यांच्या कागदपत्रांच्या तपासणीसाठी गट शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. पडताळणी यशस्वी झाल्यावर प्रवेश घेता येईल. तसेच शाळेत कोणत्याही प्रकारची कागदपत्रांची पडताळणी होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले.
आवश्यक कागदपत्र…
निवासी पुराव्यासाठी रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज किंवा टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक किंवा घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, भाडेकरार म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केल्याची आवश्यक आहे. शिक्षण विभागाकडून पत्त्याची पडताळणी करण्यात येईल. जन्मतारखेचा, उत्पन्नाचा पुरावा, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र असावे.